The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label अपरिचित शिवशाही. Show all posts
Showing posts with label अपरिचित शिवशाही. Show all posts

शिवजन्म आणि त्यादिवशीची खगोलीय स्थिती

Written By Nikhil Salaskar on Saturday, 26 March 2016 | 00:29




आज फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे शिवाजीराजे यांचा तिथीनुसार जन्मदिवस!
आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जयंती दोनदा साजरी केली जाते. दि.१९ फेब्रुवारी या दिवशी इंग्रजी तारखेनुसार आणि फाल्गुन वद्य तृतीया या तिथीला जो दिवस येतो त्यादिवशी.
शिवाजी महाराजांची जयंती केव्हा साजरी करायची, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपले संविधान तसे प्रत्येकाला स्वातंत्र्य देत आहेच.
याच विषयावर दि १९ फेब्रुवारी रोजी मी एक पोष्ट टाकली होती आणि त्यात जर तुम्ही तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या पक्षाचे असाल तर ती दरवर्षी दि १९ फेब्रुवारीला साजरी न करता दि १ मार्च रोजी करावी असे तार्किक आणि विज्ञानाचा आधारे माझे मत मी मांडले होते.
वैयक्तिक मत विचाराल तर शिवजयंती ही तिथीनुसार म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीयेला येणाऱ्या दिवशी साजरी करावी अशा मताचा मी पुरस्कर्ता आहे. त्याचे खगोलीय कारण असे कि ज्यादिवशी तुमचा जन्म झाला त्या तिथीला आणि जन्मवेळी आकाशात नक्षत्र आणि तारकांची जी स्थिती होती तीच स्थिती दरवर्षी तुमच्या जन्मतिथीला येणाऱ्या दिवशी आणि जन्मवेळी नेमकी तशीच्या तशीच असते.
अर्थात तुमच्या जन्मतिथीचं आणि वेळेचे आकाश त्यानंतर त्याच तिथीला आणि वेळेला अनेक वर्षानंतरही तसेच्या तसेच असेल. आपल्या हिंदू कालगणनेची हीच खासियत आहे.
फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजन्माच्यावेळी खगोलीय स्थिती काय होती हे समजून घेण्यापूर्वी शिवजन्मासंबंधी उपलब्ध असलेले अस्सल संदर्भ काय म्हणतात ते पाहू..
शिवछत्रपतींच्या जन्माच्या समकालीन नोंदी.......
शके १५५१ शुक्ल संवछरे
फाल्गुन वद्य त्रिती
या शुक्रवार नक्षत्र
हास्त घटी १८ पळे ३२
गड ५ पळें ७ ये दिवसी
राजश्री सीवाजी राजे सि
वनेरीस उपजले
संदर्भ : जेधे शकावली
भूबाणप्राणचन्द्रादै: सम्मिते शालिवाहने |
शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्तेचोत्तरायणे ||२६||
शिशिरर्तौ वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने |
कृष्णपक्षे तृतीयायां निशि लग्ने सुशोभने ||२७||
अनुकूलतरैस्तुगसंश्रयै: पञ्चभिर्ग्रहै: |
व्यंजिताशेषजगतीस्थिरसाम्राज्यवैभवम् ||२८||
अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं |
कमनीयतमग्रीवमुन्नतस्कन्धमण्डलम् ||२९||
अलिकान्तमिलत्कान्तकुन्तलाग्रविराजितम् |
सरोजसुन्दरदृशं नवकिंशु कनासिकम् ||३०||
सहजस्मेरवदनं घनगंभीरनिस्वनम् |
महोरस्कं महाबाहुं सुषुवे साभ्दुतं सुतम् ||३१||
अर्थ २६-३१ : शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये फाल्गून वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर, अखिलपृथ्वीचे साम्राज्यावैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिनें अलौकीक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचें लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते; त्याच्या कपाळावर सुंदर क़ंतलाग्रें पडल्यमुळे तें मोहक दिसत होंतें; त्याचे नेत्र कमळाप्रणें सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावत: हसरे, स्वर मेखासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते.
संदर्भ :- कवीन्द्र परमानंदकृत
श्रीशिवभारत(अध्यय ६वा)
संपादक:- सदाशिव महादेव दिवेकर
शिवरायांचा जन्म हस्त नक्षत्रावर झाला अस समकालीन संदर्भातून आपल्याला कळत आणि त्यावेळी उदीत रास सिंह होती असही लक्षात येत. त्यांची जन्मवेळ साधारण सायंकाळी ६.३० ते ७ च्या आसपास असावी आणि ठिकाण अर्थात किल्ले शिवनेरी होत हे आपण जाणताच.
आता आपल्या कालगणनेतील 'तिथी' म्हणजे नेमके काय असते ते पाहूया.
# तिथी ही शुद्ध भारतीय संकल्पना आहे. चंद्राच्या कलेशी तिथीचा घनिष्ट संबंध आहे. प्रतिदिनी सूर्य सुमारे १ अंश तर चंद्र सुमारे १३.३३ अंश अंतर कापतो. चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गतीची दिशा पूर्वेकडे असते. याचाच अर्थ सूर्याच्या संदर्भात चंद्र (१३.३३ – १) १२ अंश अंतर कापतो. त्यामुळे १२ अंशाची १ तिथी होते. प्रतिपदेला चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतर १२ अंश या क्रमाने शुक्ल पक्षात तृतीयेला हेच अंतर १२ x ३ म्हणजेच ३६ अंश असते तर कृष्ण पक्षात तृतीयेला हेच अंतर १८०-(३ x १२) = १८० – ३६ = १४४ अंश असते. शिवरायांचा जन्म वद्य तृतीयेला म्हणजे कृष्ण पक्षातील असल्याने त्यादिवशी चंद्र सूर्यातील अंतर १४४ अंश असले पाहिजे.
# आपली पृथ्वी १ तासात १५ अंशातून परिवलन करते. ( ३६० अंश भागिले २४ तास ) त्यामुळे पृथ्वीच्या १२ अंशातील परीवलनास ५० मिनिटांचा कालावधी लागतो आणि म्हणूनच चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवतो.
# शिवाजी महाराजांच्या जन्मवेळी चंद्र स्थिती कशी होती?
फाल्गुन वद्य तृतियेला सूर्य मावळला त्यावेळी चंद्र १२ अंश x ३ = ३६ अंश पूर्व क्षितिजाच्या खाली होता. हे ३६ अंशाचे अंतर पृथ्वीला कापायाला सुमारे २.५ तास लागतील (तासाला १५ अंश या गतीने). याचाच अर्थ शिवजन्म दिवशी सूर्यास्त जर ६.३० ला झाला असेल तर त्या रात्री फाल्गुन वद्य तृतीयेची चंद्र कोर ६.३० + २.३० म्हणजेच सुमारे रात्री ९ च्या आसपास पूर्व क्षितिजावर उगवली असेल. चंद्र हस्त नक्षत्रात असेल. हस्त नक्षत्राचा हा उल्लेख आणि संदर्भ शिवरायांच्या जन्मवेळेच्या वरील नोंदीत दिसून येतो.
आकाशातील ही नक्षत्र-स्थिती आपल्याला ‘Sky Map Pro 8’ या सोफ्टवेअरच्या सहाय्याने, शिवजन्माची ग्रेगेरीयान इंग्रजी तारीख म्हणजेच दि. १ मार्च १६३० त्या प्रणालीला देऊन संगणकाच्या पडद्यावर पहाता येते आणि ताडून घेता येते.
चित्र क्र १ मधून आपल्याला नेमके हेच लक्षात येईल. यात दिसणारी आकाशाची स्थिती त्यादिवशी रात्रौ ९ ची आहे. यात आपल्याला स्पष्ट दिसून येतय की पूर्वक्षितिजावर कन्याराशीत आणि हस्त नक्षत्रात चंद्राचे स्थान (बाणाने दर्शवले आहे) आहे.
Sky Map Pro 8 या सोफ्टवेअरचा उपयोग करून ही स्थिती झूम करून पाहिल्यास आपल्याला तृतीयेची चंद्रकोर त्यात स्पष्ट नजरेस येईल. अथवा पडद्यावरील चंद्रावर क्लिक केल्यास आपल्याला ही प्रणाली चंद्र ९०% प्रकाशमान असल्याचे दर्शवते. शिवजन्माचा कृष्ण पक्ष असल्याने आणि पौर्णिमेनंतरची ही तृतीया असल्याने चंद्रबिंब ९०% प्रकाशित असणे अगदी स्वाभाविक आहे.
यावरून शिवजन्माची तिथी, त्या दिवशीचे आकाश, नक्षत्रस्थिती आणि चंद्रस्थान व तिची कोर यांची संगणक आणि सोफ्टवेअरच्या साहाय्याने आपण अचूक सांगड घालू शकतो. हे सर्व वर उल्लेखिलेल्या समाकालीन संदर्भांशी अचूक जुळणारे आहे.
त्यानंतरच्या पुढच्या चित्रात शिवजन्माच्या वेळेची (फाल्गुन वद्य तृतीया – ग्रेगेरीअन दिनांक १ मार्च १६३०) आकाशातील नक्षत्र आणि तारे यांची स्थिती दर्शवली आहे. त्यात पूर्व क्षितिजावर साधारण संध्याकाळी ७ वाजता सिंह रास उगवताना स्पष्ट दिसत आहे.
तर शेवटच्या चित्रात त्याच तिथीला आणि वेळेला परंतू आज म्हणजेच दि २६ मार्च २०१६ या दिवशी, शिवजन्मानंतर ३८६ वर्षानंतरही नेमकी शिवजन्माच्या वेळी असलेली आकाशातील नक्षत्रांची स्थिती जशीच्या तशी पाहायला मिळते. अगदी तिळमात्रही फरक या दोन भिन्न काळातील आणि भिन्न दिवसांच्या आकाशातील स्थितीत दिसून येत नाही.
शिवजन्माच्या दिवशी आकशातील खगोलीय स्थितीचा विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि ती म्हणजे...
चंद्र आणि इतर ग्रह यांना “Wanderers in the Sky” अस म्हणल जात आणि ते आपली आकाशातील स्थिती सारखी बदलत असतात. त्यामुळे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजन्माच्यावेळी चंद्र आणि ग्रह यांची जी स्थिती आकाशात होती ती आज ३८० वर्षानंतर तशीच असेल अस होणार नाही.
आपल्या कालगणनेची ही महती आहे. आपले गुढीपाडवा, दिवाळी , नवरात्र , दसरा हे सर्व सण आणि उत्सव आपण तिथीनुसारच साजरे करतो. मग त्यात “शिवजयंती” हा जो आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा राष्ट्रीय सण आहे तोही तिथीप्रमाणेच साजरा व्हायला हवा अस नाही का वाटत?
संदर्भ: # प्रा मोहन आपटे लिखित, “खगोलीय शिवकाल”
# शिवजन्म समकालीन अस्सल संदर्भ- श्री हितेश कटारे www.facebook.com/kavirajbhushan
 
- पराग लिमये
फाल्गुन वद्य तृतीया , इंग्रजी दि २६ मार्च २०१६.

"पुरंदरच्या तहाचे" अस्सल दस्तावेज राजस्थानमध्ये

Written By Nikhil Salaskar on Friday, 24 May 2013 | 07:25


ABP माझा वर १ मे २०१३ रोजी दाखविण्यात आलेला हा भाग खास आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे
सर्व अधिकार : ABP माझा

१६५८ मध्ये महाराज कर्नाटक प्रांतात ..

Written By Nikhil Salaskar on Sunday, 20 January 2013 | 02:18



१६५८-५९च्या दरम्यान महाराज कर्नाटक प्रांतात असल्याची अजून एक नोंद.अफझलखानाने लिहिलेल्या एका पत्रातील उलेख, परगणे तेरदळचे(उत्तर कर्नाटकात) विलायतीस शिवाजी तसवीस देतो. त्यास कृष्ण गौडा देसाई बहुत मसगत करून गनिमास घेरा केले त्यावरून देसाई मजकुरास इनाम वगेरे दिले.

संदर्भ - पत्र संग्रह.

पत्र संग्रह वगळता इतर कुठल्याही संदर्भ ग्रंथात त्याकाळी महाराजांच्या हालचाली समजत नाहीत.

रांझे पाटलाची कहाणी



रांझे गावच्या पाटलाची हकीकत सर्वांनाच माहित आहे, पण हे अर्धसत्य आहे... रांझ्याचा पाटील बावाजी बिन भिकाजी गुजर याने बदअंमल केले म्हणून त्याची मोकादमी जप्त करून त्याचे हात पाय तोडले.नंतर सोनजी गुजर याने अर्ज केला. तेव्हा अर्जाची खात्री करून नंतर जमानत भरल्यावर बावाजीस सोनजीच्या हाती सोपविण्यात आले. बावाजी हा निपुत्रिक होता आणि हातपाय तोडल्यामुळे अपंग सुद्धा. सोनजी सुद्धा गुजर कुळीतील असल्यामुळे आणि बावजीची जबाबदारी स्वीकारल्यामुळे, महाराजांनी मेहेरबान होऊन रांझ्याची मोकादमी सोनजी गुजरास दिली.

संदर्भ: पत्र संग्रह


काही पुस्तकात बावाजी याचे हात पाय तोडल्यावर त्याला कसबा गणपतीच्या मंदिरा बाहेर बसविण्यात आल्याचे लिहितात. पण वरील पत्रावरून खरी हकीकत समजते.

१६५८ साली महाराज कर्नाटक प्रांतात



१६५८ च्या अखेरीस महाराज कर्नाटकात असल्याचे एक पत्र उपलब्ध आहे. एका गावातल्या निवाड्यासाठी सरकारपाशी गेले असता खालील उत्तर मिळाले. साहेब मसलतीसाठी कर्नाटक प्रांती गेले आहेत, आल्यावर काय तो निर्णय घेतील."
जर का हे सत्य असेल तर बरोबर अफजलखानाच्या मोहिमे आधी महाराज मसलतीसाठी कर्नाटकात गेले होते हे सिद्ध होते. ही मसलत कुणा बरोबर, कश्यासाठी, कुठे याचे दाखले सापडत नाहीत.

संदर्भ: शिव. प. सं.

महाराजांच्या आरमार बांधकामावर असलेला पोर्तुगीस


महाराजांनी आरमार बांधणीसाठी पोर्तुगीस नाविकांना नेमले होते अशी माहिती तर आपल्या सर्वांना आहेच पण या पलीकडे त्यांचे काय झाले याची माहिती सहसः कुठे सापडत नाही. भारतातील राजसत्तानकडे म्हण्यासारखे आरमाराच नव्हते आणि म्हणूनच युरोपीय राज्यकर्ते येथे आपल्या वसाहती स्थापू शकले. महाराजांनी आरमार स्थापून युरोपीय, अरबी, सिद्धी, आणि समुद्री चाच्यांना एक प्रकारे अव्हानच दिले होते.कल्याण, भिवंडी आणि पेण येथे महाराज युद्धनौका बांधत असल्याचे काही पुरावे पोर्तुगीस पत्रांमध्ये आढळतात. १६५८-५९ च्या दरम्यान मराठे भिवंडी, कल्याण, आणि पेण येथे वीस गलबतांचे आरमार बांधत होते आणि दांड्याच्या सिद्धीशी युद्ध करण्याची तयारी सुद्धा करीत होते. या आरमाराच्या बांधणीची जबाबदारी महाराजांनी रुय लेईतांव व्हीयेगश या पोर्तुगीस अधिकार्यावर सोपविली होती. या रुय लेईतांव व्हीयेगश बरोबर त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगश आणि तीनशेचाळीस गोरे व काळे सैनिक होते. हे सैनिक आपल्या बायकामुलांसह आणि नोकरांसह महाराजांकडे आरमाराच्या बांधकामावर होते. नंतर हे सर्व पोर्तुगीस, वसईच्या कॅप्टनने त्यांचे कान फुंकल्या कारणाने पळून मुंबईत आश्रयास गेले. 

संदर्भ: शिवछत्रपतींचे आरमार - मेहेंदळे सर

युद्धात मरण पावलेल्यांच्या स्त्रियांना वेतन



शिवचरित्रातील आणि महाराजांच्या शौर्याचा, बुद्धीचातुर्याचा कळस म्हणजे अफझल प्रकरण. प्रतापगडच्या या युद्धामुळेच खर्या अर्थाने महाराजांची एक प्रबळ शत्रू म्हणून परकीय दाखल घेऊ लागले. या युद्धाचे परिणाम म्हणजे आदिलशाहीच्या अस्ताची आणि महाराजांच्या उदयाची सुरुवात. अफझलखाना बरोबरच त्याचे अनेक सरदार आणि असंख्य सैनिक मराठ्यांनी या युद्धात कापले, त्यांची संपत्ती, शस्त्रे, हत्ती-घोडे काबीज केले आणि एकूणच आपण काय आहोत याची जाणीव परकीय शक्तींना करून दिली.
पण प्रतापगडच्या युद्धा नंतर एक वेगळेच शिवरूप आपल्याला उमजते. महाराजांच्या या अश्याच गुणांमुळे आज त्यांना देवत्व बहाल झाले आहे यात काही दुमत नाही. साडेतीनशे वर्षा पूर्वी अवघ्या ३० वर्षांचा एक युवक असे काही निर्णय घेतो म्हणजे केवळ शब्दातीत आहे.प्रतापगडाच्या युद्धात जे मारले गेले त्यांच्या पुत्रांना महाराजांनी चाकरीत घेतले. ज्यांना पुत्र नव्हते त्यांच्या बायकांना निम्मे वेतन सुरु ठेवले. 

संदर्भ: सभासद बखर आणि शककर्ते शिवराय

अशी व्यवस्था नंतरच्या युद्धांमध्ये सुद्धा सुरु होती असे समजण्यास काही हरकत नाही.
आज pension plans सरकारी कर्मचार्यांना उपलब्ध आहेत पण अशी काहीशी व्यवस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी सुद्धा महाराजांनी शहीद झालेल्या आपल्या सैनिकांसाठी केली होती हे वाचल्यावर आपण अवाक होतो.
 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations