महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशे किल्ले इतिहासाचे मुक साक्षीदार बनुन उभे आहेत. आदळणाऱ्या समुद्री लाटा, कोसळणाऱ्या वरूणसरी आणि भाजुन काढणारा अग्निसूर्य यांनी त्यांच्या भक्कम चिरेबंदीला अनेक खिंडारे पडलेली दिसतात. त्यातुनही प्राचीन महाराष्ट्राचे लष्करी सामर्थ्य ठळकपणे जाणवते. देशात इतरत्र कोठेही इतक्या बहुसंख्येने किल्ले आढळत नाहीत. त्यातही किती वैविध्य असावे! काही सागरी बेटांवर दिमाखात उभे आहेत तर काही डोंगरशिखरांचे देखणेपण वाढवित आहेत!!
महाराष्ट्रातील बहुतांश जलदुर्ग किंवा भूदुर्ग शिवरायांच्या कारकिर्दीशी निगडीत आहेत. हा थोर मराठा योद्धा तितकाच महान संघटकही होता. पन्हाळ्यासारखे काही किल्ले म्हणजे जणु छोटी गावेच होती. व्यापाराच्या मिषाने भारतात आलेल्या पोर्तुगिजांनीही येथे काही अशी छोटी गावे वसविली, त्यांच्या संरक्षणासाठी किल्ले बांधले. आज उन्हापावसाने विदीर्ण झालेले किल्ले बदलत्या काळाचे साक्षीदार तर आहेतच, पण इतिहासाचा निश्चित आकार देण्यात त्यांचे स्थान नक्कीच महत्वाचे ठरले आहे. त्यांच्या पडझड झालेल्या भिंतींमधुन आजही इतिहासाची स्पंदने जाणवतात.
Post a Comment