The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti

Written By Nikhil Salaskar on Thursday, 17 May 2012 | 00:35

देवगिरी एक मिश्रदुर्ग ....


देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.
पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच.
शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.
१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.

देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे.
दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत. अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे.
तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.
मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात


अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.
आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे.
ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations