The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » »

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 16 May 2012 | 23:59

 छायाचित्र : प्रशांत कुलकर्णी 

शिवनेरी - इथे जन्मला वाघ सह्याद्रीचा !....


छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म ज्या दुर्गावर झाला तो शिवनेरी,'दुर्ग'म्हणून प्राचीन आहे. त्याच्या परिसरातच असलेले जीवधन, चावंड, हडसर हे दुर्ग आणि नानेघाटाची दगडात कोरलेली वाट पाहताना या दुर्गांच्या प्राचीनत्वाचा अंदाज येतो.शिवप्रभूंचे बालपण शिवनेरीवर गेले.त्यांच्या काही बाललीलांचे वर्णन शिवभारत या ग्रंथात कवींद्र परमानंदाने केले आहे.छोट्या शिवाजी राजांचा घराचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडत;स्फटीकांच्या भिंतीवर पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाहून ते बोटाने दाखवून 'तू आपल्या हाताने मला दे'असे ते म्हणत असत.वाघासारखी गर्जना करून प्रेमळ दाईला भय दावत असत.मऊ मऊ माती खात असत.मुलांकडून मातीची उंच शिखरे करून 'हे गड माझे'असे म्हणत असत.

घराचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडणार्या शिवाजीराजांनी मोठेपणी आग्रा-ग्वाल्हेरपासून जिंजी-तंजावरपर्यंत घोडदौड केली.'सूर्याचे प्रतिबिंब मला आणून द्या'असे म्हणाऱ्या राजांनी मोठेपणी प्रतीपचंद्र हि मुद्रा शिरावर धरली.दाईला व्याघ्रगर्जना करून दाखवणाऱ्या राजांनी मोठेपणी औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना करून मुघलांना भयचकित केले.लहानपणी आपल्या सवंगड्याकडून मातीचे दुर्ग बांधणाऱ्या शिवाजी राजांनी मोठेपणी साल्हेर-अहिवंतापासून जिंजी-वेलोरपर्यंत दुर्गांची मोठी शृंखला उभी केली.

या अवघ्या पराक्रमाची सुरवात दुर्ग शिवनेरीवर झाली.जुन्नर नजीकचा हा दुर्ग नैसर्गिकरीत्या बुलंद असला तरी ज्या बाजूस ती अभेद्यता नाही,त्या बाजूस सात दरवाजे आणि बुलंद तटबंदी बांधून बेलाग करण्यात आला आहे.शिवनेरी या दुर्गाभोवती आणि परिसरात अनेक लेणी आहेत.
शिवनेरी या दुर्गातच ७८ विहार आणि ३ चैत्यगृह आहेत.पाण्याची ६० कुंडे आहेत.३ लेणी अपूर्ण आहेत.काही लेणी २ हजार वर्षापासूनची आहेत.तेथे कोरलेल्या ९ शिलालेखांवरून त्या लेण्यांचे प्राचीनत्व लक्षात येते.

कशी कोरली हि लेणी?कोणती हत्यारे वापरली त्या कलाकारांनी ? कोरून काढलेला दगड कोठे टाकला?कलाकार अंधारात कसे काम करत असतील?आज पुरावे नाहीत;पण अंदाज बांधता येतात.प्रकाश परावर्तीत करूनच हे काम करण्यात आले असावे;पण प्रकाशाचे परावर्तन कसे केले असावे?त्यावेळी आरसे होते का ?किंवा पाण्यावरून प्रकाश परावर्तीत करून हे लेणीचे काम केले असावे का?
शिवनेरीवर पाण्याच्या ४०-५० तरी टाक्या आहेत.काही विशाल आहेत.पाण्याचा मजबूत साठ या दुर्गावर होता.काही टाक्या बांधीव आहेत,तर काही दगडात कोरलेल्या आहेत.बाष्पीभवनाने पाणी निघून जाते म्हणून शिवनेरीच्या काही टाक्या कातळात कोरल्या आहेत.त्यावर दगडाचे छत कोरले आहे.आत पाणी स्वछच,नितळ आणि गार आहे.शिव्नेरीवरची गंगा-जमना हि टाकी अभ्यासण्यासारखी आहे.
असा हा शिवनेरी दुर्ग, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तो त्यांच्या ताब्यात कधीही नव्हता.
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations