सुप्रसिद्ध इतिहासकार श्री.वा.सी.बेंद्रे यांचा जन्म दि.13फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे इंग्रजी चौथी ते मैंट्रीक पर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूल मध्ये झाले. त्या काळी परीक्षेसाठी सोळा वर्षे वयाची अट होती. त्यामुळे व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चौदाव्या वर्षीच त्यांना जी.आय.पी. ऑडीटमध्ये बिन पगारी उमेदवारी पत्करावी लागली. तेथे ३ महिन्यात ते टंकलेखन शिकले व घरी लघुलेखन पद्धतीचा अभ्यास करून अलेनब्रदर्स मध्ये नोकरीला लागले. काही महिने त्यांनी पोर्ट ट्रस्ट मध्येही काम केले. मध्यंतरी लघुलेखनातील प्रावीण्याबद्दल त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्यावरून त्यावेळचे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन श्री. कॉव्हरटन ह्यांनी त्यांस आपले स्टेनोग्राफर म्हणून घेतले. तेथे ते सन १९५० पर्यंत होते. आपल्या कार्यक्षमतेने व निर्भीड स्वभावामुळे ते दुसर्या वर्गाचे गैझीटेड ऑफिसर झाले .सन १९५० मध्ये श्री.वा.गं.खेर यांनी त्यांना पेशवे दप्तराकडे इतिहासाभ्यासूंना मार्गदर्शन व संशोधन कार्यासाठी नेमले. नंतर सन.१९५२ मध्ये मद्रास सरकारने श्री. बेंद्रे यांची तंजावर येथील दप्तरखान्याची तपासणी करून अहवाल करण्यासाठी नेमणूक केली.
श्री. कॉव्हरटन यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने ते इतिहासाच्या अभ्यासाकडे वळले. सन.१९१८ मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहास हे संशोधनांचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. एक साधन संग्राहक,साधन संपादक,साधन चिकित्सक,संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या. सन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा" हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रास्ताविक खंड असून इतिहास संशोधनांच्या साधनांची मार्मिक चिकित्सा त्यात करण्यात आली आहे. ऐतिहासिक कागदपत्राचा गाढा अभ्यास त्या वेळेच्या सरकारच्या लक्षात येऊन सरकारने त्यांना १९४८ मध्ये पेशवे दप्तरात संशोधन अधिकारी नेमले. पेशवे दप्तरखान्याचे अधिकारी असताना बेंद्रे ह्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे. पेशवे दप्तरात सुमारे ४ कोटी ऐतिहासिक कागदपत्रांचे विस्कळीत संकलन होते. ह्या कागदपत्रांचे कॅटलॉगिंग करणे ,विषय-वार विभागणी करणे,हे अभ्यासकाच्या उपयुक्ततेचे कार्य श्री.वा.सी.बेंद्रे यांनीच मार्गी लावले. या नोंदणी मध्ये शास्त्र-शुद्धता आणि बिनचूकपणा येणे अत्यंत महत्त्वाचे होते. अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा अभ्यास करून ह्यांनी 'वन लाइन' कागदांचे कॅटलॉगिंग करावास हवे हे त्यांच्या ध्यानात येऊन ह्या सर्व कागदांची विषय वारीने विभागणी करून त्याचा वन लाइन कॅंटलोग कसा तयार करावा त्याची विस्तृत माहिती इंग्रजीत लिहून काढली. कॅंटलोग कसा करावा याच्या विस्तृत माहितीचे पुस्तक तयार केले.Alienation office Records and Poona Dafter हेच ते पुस्तक होय. इ.स. १९५० साली शासनाने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक आजही वस्तुसंग्रहालय आणि अभ्यासक ह्यांना उपयुक्त ठरत आहे. त्यांचा "Report on the Peshwa dafter or Guide to the records" हा अहवालही उपयुक्त ठरला आहे..
१९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन श्री.वा.सी.बेंद्रे यांना सरकारी " हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले. हीं शिष्यवृत्ती सुमारे दोन वर्षांची होती. तसे पाहीले तर हा कालावधी अल्पसाच होता. हे ध्यानात घेऊन इतरत्र कोठेही वेळ वाया न जाऊ देता त्यांनी सर्व लक्ष साधनांच्या अभ्यासात आणि संकल्पनात खर्च केला. टंक लेखनासारख्या अनुभवाचा त्यांना या प्रसंगी खूप फायदा झाला. दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे श्री.बेंद्रे यांचे संशोधन- संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले. त्यामुळे त्यांच्या इतिहास विषयक संशोधन कार्यातील ही शिष्यवृत्ती आणि तेथील वास्तव्य हा महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचा महत्त्वाचा टप्पाच मानावा लागतो. लंडन मधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची बेंद्रे ह्यांना संधी मिळाली होती. अशी साधने तपासताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक बहुमोल ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते .या वरून त्याच आकृतीचे चेहेरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते.इ.स.१९१९ मध्ये बेंद्रे “संभाजी महाराजांच्या चरित्र” लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते. त्यात व्हैलेन्टाइन ह्या डच गव्हर्नरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले. इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री.वा.सी.बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले. इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली. ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री.बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे "इब्राहिमखान" पुस्तकातून हटला गेला. श्री.बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासाविषयी पुस्तकातून आणि घरा घरातून झाली.
श्री.वा.सी.बेंद्रे ह्यांनी शिवशाहीच्या अंतरंगात प्रवेश केला आणि ते खोल वर गेले. मालोजी,शहाजी,शिवाजी,संभाजी,राजाराम,ह्यांच्या संबंधीचे त्यांचे संशोधन त्यांचा आवाका दाखवून देते. श्री. बेंद्रे ह्यांच्या इतिहास संशोधनाला एक आंतरिक संगती आहे. शिवशाहीतील वीरांच्या पराक्रम गाथा,आणि समकालीन मराठी मनाचे विचार ,या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे बेन्द्रेना जाणवल्यामुळे हे शेख मंहमद आणि तुकोबा यांच्या चरित्रांचा धांडोळा घेतात. तुकोबांनी तर त्यांना पूर्ण पछाडले होते असे म्हणायला काही हरकत नाही. शिवाजी हा जरी मराठी राज्याचा केंद्रबिंदु असला तरी तो समजावून घ्यायचा म्हंटला तर मागे शहाजी मालोजी पर्यंत जावे लागते. त्याप्रमाणेच तुकोबाचा अभ्यास करताना श्री. बेंद्रे त्यांची गुरु परंपरेचा शोध घेत बाबाजी केशव राघव ह्या चैतन्य परंपरेतून सूफी परंपरेत घुसले. दुसर्या बाजूला तुकोबाचे संत्तसांगाती आणि शिष्य .ह्यांचाही त्यांनी शोध घेतला. तुकोबाचे अभंग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र पसरले आहे, ते हुडकून काढून गाथेची चिकित्सक आवृत्ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांना संत वांग्मयाचाही गाढा अभ्यास होता. संत तुकाराम महाराजांबद्दल ही ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज ह्यांचे संत सांगाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यांचे ग्रंथ संत तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन ह्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संत तुकारामांच्या जीवनाबद्दल असलेल्या अनेक कल्पनांना ह्या ग्रंथामुळे धक्का बसला व तुकारामविषयी अभ्यासाला ह्या ग्रंथांनी एका शास्त्र-शुद्ध बैठक प्रथमच दिली. त्यांच्या ९२ वर्षांच्या अपार परिश्रम करूनही तुकारामाची गाथा ते पूर्ण करू शकले नाही. त्यांचे अपूर्ण स्वप्न त्यांचे मोठे पुत्र श्री.रविंद्र बेंद्रे ह्यांनी २००३ "तुकारामचे अप्रकाशित अभंग " प्रकाशित करून पूर्ण केले.
सन.१९६३ मध्ये मुंबई-मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे डायरेक्टर म्हणून ते मुंबईत आले. बरीच वर्षे त्यांनी या संस्थेची सुत्रे सांभाळली. "महाराष्ट्रेतिहास परिषद" या संस्थेचेही १९६५ पासून ते प्रमुख कार्यवाह होते. मराठेशाहीचे नीट आकलन व्हायचे असेल तर समकालीन इस्लामिक सत्तांचाही नीट अभ्यास व्हायला हवा हे श्री.बेंद्रे ह्यांनी ओळखले होते. त्यांचे कुतुबाशाहीचे विवेचन ह्या दृष्टीने पाहीलाच हवे. इतिहास संशोधनाचा एवढा प्रपंच श्री.बेंद्रे उभा करतात याचे कारण शोधपध्दत्ती आणि शोधसामुग्री याच्या वर त्यांची घट्ट पकड होती, अर्थात ती त्यांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केली होती. साधन-चिकित्सा कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे. ह्या साधनात अ -मराठी आणि विशेष करून पाश्चात्य साधनांचा समावेश करणे अर्थातच त्यांना महत्त्वाचे वाटले. पेशवे आणि तंजावर दप्तर याच्या प्रमाणे त्यांनी ब्रिटीश दप्तराचाही मागोवा घेतला. १९१८ साली ह्या ग्रंथाची सुरुवात त्यांनी केली आणि ग्रंथ पूर्ण व्हायला जवळ जवळ ४० वर्षे लागली. इ.स.१९६० मध्ये "संभाजी" चे खरे चरित्र आपणा सर्वांसमोर प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात श्री.वा.सी.बेंद्रे यांचे नाव संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व संभाजी महाराजांची पारंपारिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञात आहे. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्ति रेखाच बदलली. त्यामुळे संभाजी महाराजांची पराक्रमी,संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी,धोरणी,मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा उंचावली गेली. हे चरित्र खरया अर्थाने गाजले. अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. ह्या ग्रंथास सुद्धा साहित्य अकादमीने पुरस्कृत केले आहे. .
श्री.बेंद्रे ह्यांची ६० हून अधिक पुस्तके छापून प्रसिद्ध झाली. त्यांची 'संभाजी' 'मालोजी आणि शहाजी''शिवाजी' आणि 'राजाराम' यांच्या चरित्रांना राज्यसरकार कडून पहिल्या प्रतिचा पुरस्कार मिळालेला असून पुणे, मुंबई , मराठवाडा, शिवाजी (कोल्हापूर) प्रभुत्वी विद्यापीठे , राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रँन्सलेशन सोसायटी यांचा आश्रयही लाभलेला आहे. आधाराशिवाय व पुराव्याशिवाय आपण इतिहासातील घटना लिहित नाही,असे त्यांचे सांगणे होते आणि हे खरे होते. श्री.बेंद्रे ह्यांनी ऐतिहासिक संशोधना अंती संभाजी महाराजांची समाधी वदू-बद्रुक येथे असल्याचे सत्य शोधून काढले. आजही दरवर्षी त्या स्थळी संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते.
वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर श्री. बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे. आपल्या दीर्घ आयुष्यात चौफेर वाचन व अखंड लेखन करण्याचे व्रत शेवट पर्यंत पाळले. ह्या कामी त्यांना त्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी व त्यांची मुले ह्यांनी साथ दिली, असे ते लिहितात. त्यांनी त्यांना कौटुंबिक अगर घरकामात कधीच न गुंतवता त्यांचा सर्व वेळ अभ्यास,वाचन,लेखनात केंद्रित करण्यास सर्वोतोपरी मदत केली होती. ह्या अमोल सहाय्या मुळेच त्यांना ग्रंथा द्वारे देश सेवा करता आली. सुदैवाने श्री.वा.सी.बेंद्रे ८२ वर्षाचे ह्यांना दीर्घायुष्य लाभले आणि त्यातील क्षण अन् क्षण सत्कारणी लावून त्यांनी त्याचे सोने केले.
Post a Comment