The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » बाणकोट किल्ला

बाणकोट किल्ला

Written By Nikhil Salaskar on Thursday, 13 December 2012 | 02:01




मंडणगड तालुक्यातील बाणकोट हे लहानसे गाव. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सावित्री नदीच्या उगमस्थानावर हे गाव आहे. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर भुरळ पाडणारा आहे. गावाच्या एका बाजूला उंचावर बाणकोट किल्ला उभा आहे.
मुंबईहून येताना मंडणगड तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंतीची सुरुवात करता येते. मुंबई-गोवा महामार्गावर म्हाप्रळ पासून १८ किलोमीटर अंतरावर मंडणगड आहे.मंडणगडपासून बाणकोट २५ किलोमीटर अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास केवळ ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बागमंडला गावाला लागून असलेल्या बाणकोटच्या खाडीत फेरीबोटची सुविधा आहे. आपल्या वाहनासह या बोटीतून प्रवास करतांना केवळ पाच मिनिटात मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात प्रवेश करता येतो. वेसवीपासून बाणकोटचा किल्ला ३ किलोमीटर अंतरावर आहे.बाणकोट हे मासेमारीचे प्रमुख केंद्र असून येथून नारळ, सुपारी, आंबे, खारे मासे, माशांचे पंख आणि मावा निर्यात केला जातो. वाटेने जातांना दाट झाडीत बाणकोट खाडीच्या किनाऱ्यावर असलेली टूमदार घरे लक्ष वेधून घेतात. किल्ल्याकडे जाणारी वाट अरुंद असली तरी वाहन अगदी वरपर्यंत जाते. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. लिनी या ग्रीक तज्ज्ञाने पहिल्या शतकात या किल्ल्याचा उल्लेख 'मंदगीर' म्हणून केला होता. किल्ला आदिलशाहकडून १५४८ मध्ये पोर्तुगिजांकडे आला.पोर्तुगिजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला 'हिंमतगड' नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्‌यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास 'व्हिक्टोरिया' असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटीशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली.लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या बाजूस बांधलेले 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते.हे स्मारक १७९१ मध्ये पुण्याचा रेसिडेंट असलेल्या चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट महाबळेश्वरला जात असतांना तो मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. त्याची पत्नी सोफीया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. यास 'ऑर्थर सीट' म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध 'आर्थर सीन' पॉईंटचे नाव याच आर्थर वरून देण्यात आले आहे.नाना फडणवीस यांचे गाव वेळास किल्ल्यापासून काही अंतरावरच आहे. गावात त्यांनी बांधलेली दोन देवालये पाहायला मिळतात. हिवाळ्यात निसर्गमित्रांनी कासवांचे संवर्धन करण्यासाठी भरवलेल्या कासव महोत्सवातही सहभागी होता येते. समुद्र किनाऱ्याची भटकंती आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यासतांना वेगळेच समाधान मिळते. म्हणूनच ही भेट स्मरणीय ठरते.

डॉ.किरण मोघे 

Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations