सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. .इ.स. 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. 1699 रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700 च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि 21 एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र 1708 मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इग्रजांकडे गेला.साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत.दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही.डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसारभारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते.या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते.संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड तास लागतो.
Home »
दुर्गसंपत्ती
» अजिंक्यतारा
अजिंक्यतारा
Written By Nikhil Salaskar on Tuesday, 25 December 2012 | 02:51
Labels:
दुर्गसंपत्ती
Post a Comment